पिंपरी चिंचवड (पुणे) - कोरोना महामारीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सहा महिन्यांपासून हॉटेल्स बंद होते. परंतु, राज्य सरकारने अनलॉक 5 मध्ये हॉटेल्स चालकांना दिलासा दिला असून आजपासून अटी आणि शर्थीसह शहरातील सर्वसामान्य व्यक्तींना हॉटेल्स खुली केली आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी ग्राहकांनी हॉटेल्सकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे बहुतांश हॉटल्स हे रिकामे होते असे पाहायला मिळाले. परंतु, काही ग्राहकांनी हॉटेलमधील जेवणावर येथेच्छ ताव मारला आणि हॉटेल्स चालक आणि मालक यांनी ग्राहकांची काळजी घ्यावी असे आवाहन 'ईटीव्ही' मार्फत केले.
कोरोना महामारीमुळे अवघ्या देशात कठीण परिस्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यात, हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला होता. परंतु, कोरोना संख्या वाढीचा आलेख कमी होत नसल्याचे दिसत आहे. परंतु, हॉटेल्स चालकांची परिस्थती बघता राज्यसरकारने हॉटेल्स खुली करण्याची परवानगी अटी आणि शर्थीसह दिली आहे. आज पहिल्याच दिवशी ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली असून अल्पप्रतिसाद ग्राहकांचा होता असे खासगी हॉटेल मॅनेजर विनायक पवार यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, की नेहमी पेक्षा आज ग्राहक कमी आहेत. हॉटेलमध्ये सकाळपासून केवळ 30 टक्केच ग्राहक आले. जेवणारे कमी आणि नाष्टा करणाऱ्याची संख्या जास्त होती. ग्राहकांची सर्वोतपरी काळजी घेत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तर, दुसरीकडे काही ग्राहकांनी हॉटेलमधील जेवणावर येथेच्छ ताव मारला. गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेलमधील जेवण न मिळाल्याने आज मनसोक्त आणि पोटभर जेवण करत असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. दरम्यान, पहिल्याच दिवशी हॉटेल्स चालकांची निराश झाली असली तरी शहरातील हॉटेल्स चालकाचा व्यवसाय हळूहळू पूर्व पदावर येईल यात काही शंका नाही.
कामगाराविना हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ !
शहरातील हॉटेल्स आज पासून खुली झाली असली तरी कामगारविना काही हॉटेल बंद आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाची संख्या वाढत असल्याने परराज्यातील हजारो कामगार आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे अनेक हॉटेल्स चालक आणि मालक हे राज्य सरकारने हॉटेल्स खुली करण्यास परवानगी दिली असली तरी अडचणीत सापडले आहेत.