पुणे - बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे येथील उपबाजारात चिंचेचा मोठा बाजार भरतो. पुणे जिल्ह्यातील चिंचेची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून, सुपे बाजाराकडे पाहिले जाते. मात्र, अवकाळी पाऊस आणि टाळेबंदीमुळे यंदाचा चिंचेचा हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.
सुपे उपबाजारात यंदा झालेल्या या हंगामातील बाजारात अखंड व फोडलेल्या चिंचेच्या सुमारे ११ हजार ४५ पोत्यांची आवक झाली. अखंड चिंचेचा दर कमीत कमी पंचवीसशे आणि जास्तीत जास्त ६ हजार ५०० तर फोडलेल्या चिंचेचा दर कमीत कमी 8 हजार ते जास्तीत जास्त सोळा हजार सहाशे इतका होता. मागील हंगामात हीच आवक ४८ हजार ४५४ इतकी होती. मात्र, मागील वर्षीपेक्षा बाजारात पन्नास टक्क्यांहून अधिक म्हणजेच गत वर्षी ६ कोटींची उलाढाल झाली होती. या हंगामात २.२५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
टाळेबंदीत वाहतूक बंद असल्याने आणि वेळोवेळी बाजार बंद राहिल्याने चिंचेची खरेदी-विक्री तेवढ्या प्रमाणात होऊ शकली नाही. तसेच बाजारपेठ व मालाला उठाव नसल्याने चिंचेचा भाव पन्नास टक्क्यांनी घटला. त्यामुळे शेतकऱ्यांसह बाजार समितीला ही मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील बाजारात बारामतीसह इंदापूर, शिरूर, पुरंदर, हवेली, दौंड, भोर, मावळ, सोलापूर, फलटण, सातारा, आदी भागातील शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतात. तर लातूर, तुळजापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बार्शी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी ठिकाणाहून खरेदीदार व्यापारी येत असतात, अशी माहिती बारामती बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी दिली.
मागील वर्षीच्या तुलनेत चिंचेची उलाढाल निम्म्यावरच -
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे येथील बाजारात पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा चिंचेचा बाजार भरतो. मात्र टाळेबंदी व अवकाळीमुळे बाजारात चिंचेची आवक घटली. मागील वर्षीच्या तुलनेत ३.७५ कोटी रुपयांची तफावत यंदाच्या चिंचेच्या उलाढालीतून झाली आहे. गत वर्षी ६ कोटींची उलाढाल झाली होती मात्र या वर्षी केवळ २.२५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.