दौंड (पुणे) - राज्य वनमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांसह अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दौंड तालुक्यातील चौफुला ते वरवंड पर्यंतचा प्रवास पीएमपीएल बसने केला. हडपसर ते वरवंड या पीएमपीएल बस सेवेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. हडपसर ते वरवंड ही पीएमपीएल सुविधा गोरगरिबांना वरदान ठरणार असल्याबाबतचे प्रतिपादन भरणे यांनी चौफुला येथे केले.
वरवंड वरून बस चौफुल्यावर येत असताना हलगी वाजवून व फटाक्यांनी स्वागत करण्यात आले. वरवंड, केडगाव, चौफुला, बोरीपार्धी, देऊळगावगाडा, पडवी, पारगाव, नांनगाव, दापोडी, खोपोडी, वाखारी आदी गावातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बससेवेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार मजूर आदी वर्गाला मोठा फायदा होणार. भरणे यांनी चौफुल्याची आजची परिस्थिती व पूर्वीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. खूपच जलद गतीने पीएमपीएलमुळे परिसर विकसित होणार आहे. थोरात यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बस सेवा सुरू झाल्याबद्दलचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, पंचायत समिती सभापती हेमलता फडके, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, पाराजी हंडाळ, मीना धायगुडे, दिलीप हंडाळ, बोरीपार्धी चे सरपंच सुनील सोडणवर, उपसरपंच ज्योती मगर, वरवंड सरपंच मीनाताई दिवेकर, भानुदास नेवसे, त्रिंबक सोडनवर, बाळासाहेब सोडनवर, नितीन दोरगे यांसह अनेक राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
पाटसपर्यंत पीएमपीएल बस सेवा सुरू करण्याची मागणी..
पीएमपीएल बस पाटसपर्यंत यावी अशा मागणी पाटस गावाची आहे. या मागणीचे निवेदन पाटस ग्रामस्थांच्या वतीने नितीन शितोळे आणि गणेश चव्हाण यांनी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांना दिले. पाटस गावाची लोकसंख्या मोठी असून पीएमपीएल बस पाटस पर्यंत आल्यास अनेकांना या बस सेवेचा फायदा होऊ शकतो.