पुणे : आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. मात्र पालखीच्या पहिल्याच दिवशी या सोहळ्याला गालबोट लागले आहे. दुपारच्या वेळेस मंदिरात प्रवेशासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचा विरोधी पक्ष नेते अजित पवार व शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे निषेध केला आहे.
गृहमंत्र्यांनी पोलिसांना सुचना द्याव्या : सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र कधी नव्हे ते आज वारकऱ्यांवर अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला. दरवर्षी वारकरी मोठ्या संख्येने येत असतात, परंतु असे कधीच घडत नाही. आज जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी पूर्ण होईपर्यंत पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्या.'
लाठीचार्ज झाला नाही - पोलीस आयुक्त : या प्रकरणी बोलताना पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील फक्त 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नियोजन सुद्धा करण्यात आले होते. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा हा निर्णय मान्य केला होता. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी येथे घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार त्यांना समजावण्यासाठी आले, पण ते युवक ऐकत नव्हते. त्यांनी बॅरिकेड तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याशी किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, असे म्हणणे चुकीचे आहे. सर्व वारकरी प्रशासनाला उत्तम सहकार्य करत आहेत. महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असे ते यावेळी म्हणाले.
'हा वारकऱ्यांचा अपमान' : या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवरील लाठीचार्ज हा वारकऱ्यांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. वारकऱ्यांवरील लाठीचार्ज समस्त वारकऱ्यांचा अपमान आहे. दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणे चुकीचे आहे. - छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस
हेही वाचा :