पुणे Lalit Patil Case Update : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेकायदेशीर सोनं उपलब्ध करून दिल्याच्या संशयावरून नाशिकच्या सराफ बाजारातील रेणुका ज्वेलर्सचा संचालक अभिजित दुसाने याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
ड्रग्जच्या पैशातून करायचे सोने खरेदी : ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी नाशिक येथील अभिजित दुसाने या व्यापाऱ्याकडून काही किलो सोनं खरेदी केलं असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. ड्रग्जच्या पैशातून ललित आणि भूषण सोने खरेदी करायचे. तसंच या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे. अभिषेक आणि अर्चनाकडे सापडलेले सोन्याचे दागिने याच सरफाकडून घेण्यात आले असल्याचं तपासात समोर आलं आहे.
मित्र-मैत्रिणींना देखील पोलिसांकडून अटक : ललित पाटील याला अटक केल्यानंतर ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उघड होत आहे. अटकेत असलेला ललित पाटील हा उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात असताना तो तेथून पळून गेला होता आणि यानंतर ललित पाटील पलायन प्रकरण राज्यात मोठ्या प्रमाणात गाजलं. काही दिवसांपूर्वी ललित पाटील याला मदत करणाऱ्या त्याच्या भावाला, मित्राला, प्रेयसीसह मैत्रिणींना नाशिकमधून पुणे पोलिसांनी अटक केली होती. असं असताना आता पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अरहाना याला देखील काल पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.
ललित पाटील प्रकरणी तपास सुरुच : पुणे येथील ललित पाटील प्रकरणात पोलिसांकडून कारवाईचे सत्र अद्यापही सुरुच आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री नाशिकममधील गिरणा नदीपात्रात टाकलेले कोट्यवधींचे ड्रग्स शोधून काढले. त्यानंतर ललित पाटील याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिला पुणे पोलिसांनी अटक केले. त्यानंतर आता ललित पाटील याचे आर्थिक कनेक्शन शोधले जात असून या प्रकरणी नाशिकमधील सराफाला आता अटक करण्यात आलीये. त्यामुळं हे प्रकरण आता पुढं काय वळण घेईल याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.
हेही वाचा -
- Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; 'या' कारणामुळे पोलीस करणार माजी महापौरांची चौकशी...
- Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
- Manisha Kayande On Supriya Sule : सुळे, आव्हाडांचा ड्रग्ज तस्करांशी संबंध? मनिषा कायंदे म्हणाल्या उत्तर द्या!