पुणे - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-ओझर रस्त्यावर कुकडी नदीवरच्या पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या पुलाच्या स्लॅबचेही नुकसान झाले आहे. यासोबत कठडेही तुटले असून अष्टविनायक गणपती दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
अष्ठविनायकपैकी एक असणाऱ्या ओझरला जोडणारा या पुलावरुन रोज मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी, कारखान्याच्या ऊस गाड्या, माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते असते. वाहतुकीच्या दृष्टीने मुख्य असलेल्या या पुलावर आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही की साधी पाहणी देखील केली नाही.
या पुलावर सध्या मोठा खड्डा पडला असुन हा खड्डा अजून मोठा होऊन भविष्यात एखादा बळी जाण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ९ फेब्रुवारी, १९७९ साली या पुलाचे उद्घाटन तत्कालीन ग्रामविकास माहिती व जनसंपर्क मंत्री राजारामबापू पाटील यांच्या हस्ते झाले होते. ४० वर्षांत या पुलाची ही अशी अवस्था झाली आहे. अष्टविनायक रस्त्याचे काम सुरू असताना या पुलाची अशी बिकट अवस्था आहे. लवकरात लवकर पुलाचे काम व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.