पुणे: कसबा चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक व भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनांनंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू झाली आहे. त्यासाठी मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास : महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तर मी 15 हजार मताधिक्याने विजयी होणार असल्याचे सांगितले आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी मी 25 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत पहायला मिळाली.
पोटनिवडणुकीत किती टक्के मतदान : कसबा पोटनिवडणुकीत 26 फेब्रुवारीला मतदान पार पडले. कसबा मतदार संघात 50 टक्के मतदान झाले आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. कसबा पेठ विधानसभा या मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले आहे. कसबा मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत. त्यात 1,38,018 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 63,800 महिलांचा आणि 74,218 पुरुष समावेश होता. आत्ता या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात असल्याचे दिसत आहे.
राज्यातील सर्वच नेते मंडळी होती कसब्यात : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार हा अतिशय रंगतदार होता. सुरवातीपासून प्रचारात स्थानिक मुद्दे आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळींचा प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. या सर्व नेते मंडळींनी प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे कमी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच राज्य आणि देशातील मुद्दे प्रमुखाने मांडले होते.