पुणे: जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत आणि मतदार संघात सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तर होणार फौजदारी कारवाई: या कालावधीत निवडणूक निर्वाचण कार्यक्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करू शकतील. परंतु, या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय: कसबा पोटनिवडणुकीत प्रचार करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपली ताकद पणाला लावली आहे. पुण्यातील नातूबाग येथे कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा काल रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण सुरू असताना तेथून जाणाऱ्या भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार रॅलीत भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पोलिसांना ही बाब लक्षात आणून दिली.
हा तर भाजपचा रडीचा डाव : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेवेळी अजित पवार यांचे भाषण सुरू असताना सभेच्या बाहेरील बाजूस असलेल्या रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकमेकांच्या प्रचारासाठी वेगवेगळे विभाग दिले जातात. मात्र आमची नातू बाग येथील सभेच्या ठिकाणी भाजप उमेदवाराची रॅली काढण्यात आली. याबाबत आम्ही पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली. पोलीस भाजपच्या दबावाखाली काम करीत आहे. हा रडीचा डाव असल्याची टीकाही जगताप यांनी केली आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis : मोठी बातमी! पहाटेचा शपथविधी शरद पवारांना विचारूनच; फडणवीसांचा गौप्यस्फोट