पुणे : शनिवारी दुपारी पैसे वाटत असताना हरिहर यांना अडवल्याप्रकरणी बदला घेण्याच्या भावनेने रात्री 25 ते 30 लोक येऊन गंज पेठ 630 येथे राहणाऱ्या लोकांना शिविगाळ करत मारहाण केली. अशी माहिती तिथे राहणाऱ्या नागरिकांनी व काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी दिली. रमेश बागवे यांच्या सांगण्यानुसार या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. कसबा पोटनिवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे.
भाजपवर आरोप करत उपोषण : याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कसबा पोट निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत कसबा मतदारसंघामध्ये रंगली आहे. शनिवारी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आरोप करत उपोषण केले. त्यानंतर 5 तासाच्या उपोषणानंतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.
लाथा बुक्क्यांनी मारहाण : या प्रकरणाची माहिती देत असताना रमेश बागवे म्हणले की, 630 कसबा या भागामध्ये भाजपचे नगरसेवक व त्यांच्या साथीदार पैसे वाटत असताना त्यांना स्थानिकांनी विरोध केला. यामुळे त्यांनी तिथे बेदम मारहाण केली आहे. आमच्या महिला भगीनींना लाथा बुक्काने मारहाण केली आहे. हा प्रकार निंदनीय आहे. त्यासोबत जातीवाचक शिव्या दिल्या आहेत. तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाही, अशा धमक्या दिल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करण्याच काम करत आहे, अशी माहिती माजी मंत्री रमेश बागवे यांनी दिली आहे.
कसबा मतदारसंघाची माहिती : पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कसबा म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाला 'हार्ट ऑफ पुणे सिटी' या नावानेही संबोधले जाते. आता विधान परिषद निवडणुकांनंतर पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ पोट निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने पोट निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या पोट निवडणूकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे.