आळंदी Kartiki Ekadashi Yatra : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारपासून सुरु होत आहे. शनिवारी कार्तिकी एकादशी झाली तर आज संजीवन समाधी सोहळा सुरू होणार आहे. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावं, यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंद पुकारलाय. यामुळं यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ शकते.
काय आहे नेमकं प्रकरण : आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडं पत्र व्यवहार करण्यात आला होता. मात्र संबंधित प्रशासनानं स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशीवर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केलीय. तसंच तत्कालीन विश्वस्तांना मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आलीय. याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. प्रशासनानं याकडं योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी बहुसंख्येनं आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत 6 विश्वस्त : बैठकीतील माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत 6 विश्वस्तांची 7 वर्षांसाठी पुणे जिल्हा न्यायालय न्यायाधिशांकडून नेमणूक केली जाते. आधीच्या विश्वस्तांचा कार्यकाळ संपल्यामुळं नविन तीन विश्वस्तांची नियुक्ती तर तीन विश्वस्तांना मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिलीय. 20 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्हा न्यायालयानं डाॅ. भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ अशा तीन नवीन विश्वस्तांची नियुक्ती केलीय. तर अजून तीन विश्वस्त नियुक्ती होणार आहेत.
स्थानिकांना प्राधान्य देण्यात येण्याची मागणी- पहिल्या टप्प्यात झालेल्या 3 विश्वस्त नियुक्तींमध्ये आळंदीकर ग्रामस्थांचा समावेश केलेला नाही. आळंदीतून विश्वस्त पदासाठी 10 हून अधिक अर्ज पाठिवण्यात आले आहेत. त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातील विश्वस्त नियुक्तीदरम्यान, स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी आळंदीकर ग्रामस्थांची मागणी आहे. आतापर्यंत एकदाही विश्वस्त म्हणून आळंदीकर ग्रामस्थांची माऊली संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा ग्रामस्थांनी दावा केला.
हेही वाचा :