पुणे - सह्याद्री पर्वत रांगामधुन येणाऱ्या पाण्यावर खेड तालुक्यात कळमोडी, चास-कमान, भामा-आसखेड हि तीन धरणे बांधण्यात आली आहेत. या पाण्याचा वापर पिण्याचे पाणी व शेतीसाठी केला जातो. मागील १५ दिवसांपासून भिमाशंकर परिसरात जोरात पावसाचे आगमन झाल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आरळा नदीवरील कळमोडी हे धरण गुरुवारी पहाटेच्या सुमारास ओव्हर फ्लाे झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील १०० टक्के भरणारे कळमोडी हे पहिले धरण आहे. कळमोडी हे धरण आरळा या नदीवर असून आता ही नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आणि गुरुवारी कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १.५१ टीएमसी पाणीसाठा या धरणात आहे. धरण भरल्याने त्यावरून सुमारे शंभर क्युसेक वेगाने पाणी खाली कोसळत असल्याने आरळा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या नदीचे पाणी आता चास-कमान धरणात येत असुन चास-कमान धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे चास-कमान धरणात ३० टक्के इतका पाणी साठा उपलब्ध झाला आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरी वर्गात दिलासा मिळणार असल्याने शेतकरी आनंदीत आहे.