पुणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गौरवच्या हत्येप्रकरणी टॅक्सी चालक भगवान केंद्रे (उस्मानाबाद) आणि अमोल मानकर (वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गौरव उदाशी हा गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राहत होता. शुक्रवारी रात्री गौरव जेवायला जातो सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यांचा मृतदेह पुणे शहरातील वाघोली येथील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. घटनास्थळी त्याची दुचाकी देखील सापडली होती. दुचाकीवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैशाच्या वादातून हत्या: या हत्येचा पोलिसांकडून अधिक तपास केला असता गौरव याचा खून आरोपी भगवान केंद्रे याने केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास केला आणि सापळा रचून त्याला परतापूर येथून ताब्यात घेतले. यानंतर आरोपी केंद्रेची कसून चौकशी केली गेली. यादरम्यान त्यानेच मयत गौरवने 3 हजार रुपये परत न दिल्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली.
वेळेवर पैसे न दिल्याने उद्भवला वाद: याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी भगवान हा पुण्यात चारचाकी वाहन चालवतो. गौरवने आपल्या ॲपवरून दोन वेळा नोंदणी केली होती. यावेळी गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. तेव्हा गाडी भाड्याने घेतली म्हणून गौरव याला भगवानला 3 हजार रुपये देणे होते. गौरवने वेळेवर पैसे न दिल्याने आरोपी भगवान हा त्याच्यावर चिडून होता. भगवानने शुक्रवारी रात्री गौरवला बोलावून घेतले आणि तेथे त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा आरोपी भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरववर शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
हेही वाचा: