पुणे - काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारीची आळंदीत तयारी सुरु झाली आहे. यासाठी 'चला वारी'ला या टीमच्या माध्यमातून 'वारी स्वच्छतेची, पवित्र इंद्रायणीची' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून इंद्रायणी नदीमधील मैला, निर्माल्य, कचरा, प्लॅस्टीक, कपडे व इतर अस्वच्छ पदार्थ बाहेर काढण्यात आले.
नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदीमधील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या आरोग्याच्या हेतूने इंद्रायणी स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली.
या मोहीमेसाठी धानोरी विश्रांतवाडी भागातील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर हिमगिरीयन्स, लुंकड रिअॅलिटी ग्रुप, लोकराज्य संघ व इतर सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते असे सर्वजण मिळून 'चला वारी'ला ही टीम तयार केली. या टीममार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहीमेत केवळ नदीकाठचा परिसर स्वच्छ न करता नदीमध्ये उतरुन तरुण, तरुणी, महिला आणि अबालवृद्धांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात ९ ट्रॅक्टर भरुन कचरा काढण्यात आला.
दरम्यान, आषाढी वारीत सामाजिक बांधिलकीतून चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले जाते. सध्याची तरुणाई असे उपक्रम उत्सुपुर्तपणे करताना पाहायला मिळतात.