दौंड - कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अंशकालीन घोषीत करणे तसेच सरकारी सेवेमध्ये सामावून घेणेसाठी ५० टक्के कोटा राखीव ठेवण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
![rahul kul](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-daund-mla-rahul-kul-av-10059_03022021085831_0302f_1612322911_484.jpg)
कोरोना काळात हजारो रुग्णांचे वाचवले प्राण :
महाराष्ट्र व पर्यायाने संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने हजारो कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. यांमध्ये नर्सेस, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आदींनी जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी काम केले. हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. देश व महाराष्ट्राच्या हितासाठी हजारो रुग्णांना सेवा देणाऱ्या या कंत्राटी कामगारांच्या सेवेची दखल घेऊन कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने अंशकालीन घोषीत करून त्यांना शासकीय आरोग्य सेवेत कायम करणे बाबत सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती आमदार कुल यांनी केली आहे.
आरोग्य विभागातील भरतीमध्ये ५० % कोटा राखीव ठेवावा :
मलेरियाच्या धर्तीवर सध्या अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाच्या धर्तीवर कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सेवा कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील भरतीमध्ये ५० टक्के कोटा राखीव ठेवण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली. याबाबत शासन सहानुभूतीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी केली आहे.