पुणे - सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याची पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या त्याच्या अंत्ययात्रेत अनेक जण सहभागी झाले होते. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शंभर जणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. तर 50 हून अधिक दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तीक्ष्ण हत्याराने वार करून केला होता निर्घृण खून -
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सहकारनगर परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार माधव वाघाटे (वय 27) याचा बिबवेवाडीत दहा जणांच्या टोळक्याने दगडधोंडे अन तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी चार जणांना अटकही केली होती.
अंत्ययात्रेत जवळपास 200 हून अधिक जण सहभागी -
दरम्यान माधव वाघाटे हा सराईत गुन्हेगार होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने त्याचे समर्थक सहभागी झाले होते. इतकेच नाही तर 100 हून अधिक दुचाकीवरून त्याच्या समर्थकांनी रॅली काढली होती. कोरोना काळात 25 हून अधिक नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी परवानगी नाही. असे असतानाही या अंत्ययात्रेत जवळपास 200 हून अधिक जण सहभागी झाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ उजेडात आल्यानंतर वृत्तपत्रातून या प्रकरणाच्या बातम्या आल्या. त्यामुळे पुणे पोलिसांवर टीका होऊ लागली. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
सोमवारी रात्रीपर्यंत शंभर जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात -
पोलिसांनी आक्रमक रूप धारण करीत पंधरा पोलिसांच्या पथकांच्या साहाय्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची ओळख पटवली आणि त्यांची धरपकड सुरू केली. सोमवारी रात्रीपर्यंत यातील शंभर जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन या सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. तर सहभागी झालेल्या आणखी तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यात कुठेही लस निर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच - अजित पवार