पुणे - आगामी विधानसभेतील निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत, तर काहीजण आपल्यालाही चौकशीला सामोरे जावे लागेल या भीतीने भाजपमध्ये पळत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यामुळे या दोन्ही पक्षाचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशामुळे भाजप चोरांचा पक्ष होतो की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपने आतापर्यंत वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांना आश्वासन दिली. मात्र, कोणतेच आश्वासन पूर्ण झाले नाही. याउलट आम्हीच सत्तेवर येऊ आणि आपले प्रश्न आपणच सोडवू असे भासवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, आरक्षणावर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या लोकांना आरक्षण मिळत आहे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला कशाप्रकारे हरवता येईवल हा विचार करावा. तसेच नाहीतर ज्याप्रकारे भाजपने काश्मिरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांचा वापर केला आणि आपले पाय रोवले. यानंतर त्यांनी कलम 370 रद्द केले. तसेच एके दिवशी आरक्षण रद्द करतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.