पुणे : पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी काल औरंगजेब मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर आंबेडकर म्हणाले की, कोणाच्या मजारीवर किंवा कबरीवर जाऊन तुम्ही फुले वाहू शकत नाही, हा कायदा दाखवा. तसेच स्टेटस ठेवले म्हणून ज्यांना-ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी त्या अधिकाऱ्यावर उलटी केस करावी. माझी बदनामी केली आहे, मला नाहक पकडण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी हिंमत दाखवावी. मी कोणाचेही स्टेट्स ठेवले तर इतरांना काय त्रास होत आहे, असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भ्रष्टाचाराचा आरोप पण कारवाई नाही : प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बोलताना सांगितले होते की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्र सहकारी बँक तसेच सिंचन व खननमध्ये 70 हजार कोटीचा घोटाळा केला आहे. देशातील सर्व यंत्रणांकडून पडताळणी करूनच त्यांनी हे आरोप केले असतील; पण आज एक महिना झाला तरी कुठलीही कारवाई नाही. 1990 साली राज्यसभेत मी गेल्यावर काँग्रेसचे सरकार होते आणि तेव्हा त्यांनी एमटीएनएलमध्ये घोटाळा झाला असे सांगितले पण निष्पन्न काहीच झाले नाही. मात्र, ज्यांच्यावर आरोप झाला त्यांची राजकीय कारकीर्द संपली.
गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन : मागच्या 10 वर्षात भाजपकडून देशातील अनेक लोकांवर आरोप झाले. त्यांच्यावर ईडीची छापेमारी झाली. एफआयआरही झाली आणि अटक देखील झाली. पण, आरोप सिद्ध झाले नाहीl. राज्यात कसे राजकारण चालले आहे हे आपण पाहत आहोत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आरोप केला आहे, त्याबाबत भाजप आणि पंतप्रधान यांनी 10 दिवसात गुन्हा दाखल करावा. असे न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला. तसेच या आंदोलनात काँग्रेस आणि शिवसेना यांना देखील सहभागी करून घेणार आहे, असे देखील यावेळी ते म्हणाले.
संभाजी भिडेंना शासनाचे अभय: संभाजी भिडे यांच्याबाबतीत आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगावच्या संदर्भात मिलिंद एकबोटे यांना अटक होते; पण संभाजी भिडे यांना अटक होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, शासनाने त्यांना अभय दिले आहे. सध्या देशात विरोधी पक्षाकडून इंडियाची स्थापना झाली असून त्यात तुम्ही सहभागी होणार का? यावर आंबेडकर म्हणाले की, आता ऑल इंडियाचे राजकारण संपले आहे आणि नावाला राजकारण सुरू आहे; पण राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. इंडियाने मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही, असे देखील यावेळी प्रकाश आंबेडकर बोलले.
हेही वाचा: