पुणे - काल पुण्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यंदा महापालिकेत आमचीच सत्ता येईल, असे म्हटले होते. यासंदर्भात बोलताना मी पुणे महापालिकेत विजय खेचून आणेल, असे प्रत्युत्तर दिले आहे. सत्ताधाऱ्यांना नेहमी आपलीच सत्ता येणार असे वाटते, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुण्यातील विधानभवनात येथे जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर झालेल्या पत्रकार पारिषदेत ते बोलत होते.
माझा ईव्हीएमवर विश्वास -
माझा ईव्हीएमवर विश्वास आहे. मात्र, ते माझे वैयक्तिक मत आहे. ही सरकारची भूमिका नाही. त्याविषयी चर्चेअंती निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच 2020 - 21 वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात कोल्हापूरसाठी 375 कोटी, सोलापूरसाठी 470 कोटी, सांगलीसाठी 320 कोटी, सातारासाठी 375 कोटी आणि पुण्यासाठी 680 कोटी मंजूर करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवजयंती साधेपणाने साजरी करावी -
शिवजयंती संदर्भात राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व खबरदारी घेवून आपण वर्षभर सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे केले आहे. हजारो लोक शिवजयंतीला आले पाहिजे, असे मला वाटते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 जणांच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करण्यात यावी, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच -
विधानसभा अध्यक्षपद ही जागा काँग्रेसकडेच आहे. ती त्यांच्याकडेच राहील. त्यात काहीही बदल करायचा असेल, तर त्याचा निर्णय आमचे नेते शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे घेतील, असे मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले.
थोडी तारांबळ होईल -
केंद्राकडून राज्याला जीएसटीचे 27 कोटी येणे आहे. पण ते येत नाही. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना थोडी तारांबळ होणार आहे. केंद्र सरकारने आम्हाला ही थकलेली रक्कम देईल, अशी अपेक्षा असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा - उत्तराखंड हिमस्खलन: सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू; ३६ मृतदेह सापडले २०६ बेपत्ता