पुणे - किरकोळ वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना आज सकाळी पुण्याच्या बुधवार पेठेत घडली आहे. मीना शेख (वय ३० वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती खून करून पळून गेला आहे.
पोलीस निरीक्षक नावंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेत हे शेख दाम्पत्य राहतात. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढला आहे.
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मीना शेखचा मृतदेह शवविच्छेदनसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.