पुणे : ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यास पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. यासाठी सुरुवातीला पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यातील तिघांच्या अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने फक्त दोघांनाच या लसीचा डोस देण्यात आला. यातील एक स्वयंसेवक ३२ वर्षाचा तर दुसरा ४७ वर्षाचा आहे. लस दिल्यानंतर अर्धा तास निरिक्षण करून त्यांना घरी सोडण्यात आले.
भारती हॉस्पिटलमधील डॉ. संजय ललवाणी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, यातील दुसरा डोस २८ दिवसांनी स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. त्यानंतर ९० दिवसांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला जाईल आणि १८० दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाईल. सहा महिन्यांमध्ये लसीच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब होऊ शकेल. पुढील सात दिवसांमध्ये आणखी २५ जणांना लस दिली जाणार असल्याची माहितीही डॉ ललवाणी यांनी दिली.
ऑक्सफोर्ड विद्यापीठात ही लस विकसित करण्यात येणार आहे. लसींच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटतर्फे अॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्विडिश कंपनीशी करार करण्यात आला आहे. कोव्हिशिल्ड या लसीची सुरक्षितता, क्षमता यांची चाचणी केली जाणार आहे. ‘केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेतर्फे (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) सर्व मान्यता मिळाल्या आहेत. देशातल्या विविध 17 शहरात या लसीच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
ज्या ३२ वर्षीय तरुणावर या लसीची चाचणी करण्यात आली, त्यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला. भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणी होणार असल्याची माहिती सोशल मीडियातून मिळाली होती. त्यानंतर मी हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि नावनोंदणी केली. त्यानंतर हॉस्पिटलने माझ्या सर्व तपासण्या केल्या. त्यात मी चाचणीसाठी पात्र असल्याचे समजल्यावर आनंद झाला, असे ते म्हणाले.