पुणे- पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढुन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडू लागल्याने चिंत्ता वाढली आहे. कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्तीची रोग प्रतिकारक्षमता चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपथी गोळ्यांचे मोफत वाटप जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व हुतात्मा राजगुरु स्मारक समिती यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.
खेड तालुक्यात १५ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याला जोड म्हणून अर्सेनिक अल्बम-३० या होमोपॅथिक गोळ्यांची मदत घेतली जात आहे. या गोळीमुळे माणसाच्या शरीरातील रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी मदत होते. यामुळे गोळ्यांचे सेवन केल्यास कोरोनाच्या महामारीवर यशस्वी मात करण्यासाठी मदत होईल. राजगुरुनगर शहरासह विविध गावांत या गोळ्यांचे मोफत वाटप केले जात आहे. या वाटपाची सुरुवात राजगुरुनगर येथून करण्यात आली आहे.
कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करुन कोरोना विषाणूचा समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीच्या गोळ्यांचे वाटप करुन कोरोनावर यशस्वी मात करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले आहे.