पुणे - शहर आणि ग्रामीण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर लोणावळा आणि मावळ परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढ्यासह धबधबे, धरणे, तलाव हे ओव्हरफ्लो झाली आहेत.
मावळ आणि लोणावळा येथे १४०६ मिमी पाऊस झाला आहे. तर फक्त लोणावळ्यात २४ तासात तब्बल ३७५ मिमी पाऊस झाला आहे. मावळ आणि लोणावळा हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर आहे. परंतु, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने येथील नदी, नाले, ओढ्यासह धबधबे, धरणे, तलाव हे ओव्हर फ्लो झाली आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झालेले आहेत. तर तळेगाव येथे भुयारीमार्गात पाणी साठल्याने त्याला जलतरण तलावाचे स्वरूप आले आहे. त्याचे नुकतेच राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते उदघाटन झाले होते.
मावळ तालुक्यात वडगाव-१५८ मिमी, तळेगाव दाभाडे-१३५ मिमी, खडकाळा-१९८ मिमी, कार्ला-२६५ मिमी, लोणावळा-३७५ मिमी, शिवणे - ९६ मिमी असा पाऊस झाला आहे.