पुणे - महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांची ऐकी, कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि मनोमिलनाने केलेले काम, हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे रहस्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. सुशिक्षित वर्ग हा अत्यंत विश्लेषक असतो. चिकित्सक वर्गाने पूर्ण वर्षभर महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चिकित्सा करून मतदान केले. सुशिक्षित मतदारांनी एक चांगला कौल महाविकास आघाडी सरकारला दिला, असे मत राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.
अनेक नेत्यांची भाजपमध्ये घुसमट
भारतीय जनता पक्षात आज अनेक नेत्यांची घुसमट होत आहे. अनेक नेते पुढील काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये येतील, असा विश्वास यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केला. आत्ताच्या निवडणुकीचे निकाल पाहता राज्यातील जनता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या मागे उभे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असेही टोपे म्हणाले.