बारामती - राज्यात गुटखा विक्री बंदी असल्याने कर्नाटक राज्यातून चोरून आणताना, पावणेपाच लाख रुपयांचा सुगंधी गुटखा शुक्रवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी पकडला. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने, आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप प्रकाश कदम ( वय २१ रा. गंगावळण, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा बाजारपेठेतून सुगंधित गुटखा, पान मसाला सुगंधी तंबाखू, सुगंधी सुवासिक सुपारी खरेदी करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीमधून इंदापूर हद्दीत बारामती रोड बायपास उड्डाणपुलाजवळ घेऊन येत असताना पोलिसांना संशय आला. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता विक्रीसाठी आणलेला गुटखा आढळला. गाडीमध्ये पाठीमागील बाजूस सीटवर तीन बॉक्समध्ये गुटखा मिळाला. एकूण ४ लाख, ७३ हजार, १०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - आयटी नगरीतील 105 वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात
हेही वाचा - 44 लाखांचा दारूसाठा जप्त, तीन आरोपींना अटक