पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, म्हणूनच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही होत आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात मात्र या उलट चित्र आहे. इथला भात शेतकरी या अवकाळी पावसामुळे मालामाल झाला आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.
नितीन गायकवाड यांना भात शेतीने अच्छे दिन आणले : पुण्याच्या मावळ तालुक्यातील नितीन गायकवाड यांना भात शेतीने अच्छे दिन आणले आहेत. गायकवाडांना तीन एकर क्षेत्रात गेल्या वर्षी 5 टन इंद्रायणी भाताचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा तीस टक्क्यांनी वाढ झाली असून 7 टन इतके उत्पादन झाले आहे. तसेच, चंद्रशेखर देशपांडेंना सुद्धा या अवकाळी पावसाने चांगलेच तारले. त्यांच्या दोन एकर शेतीतुन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अडीच पट अधिक भाताचे उत्पादन झाले आहे.
दिवाळीत अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी : राज्यभर अवकाळी पावसाने थैमान घातले. पुण्याच्या मावळ तालुक्यात ही या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या पावसामुळे सोयाबीनचे 40 टक्के, भुईमुगचे 30 टक्के तर पालेभाज्यांचे 50 टक्के नुकसान झाले. अशात हा भात मात्र डौलाने उभा राहिला आणि हाच भात आता शेतकऱ्यांना मालामाल करतो आहे. मावळ तालुक्यात एकूण 16 हजार हेक्टर क्षेत्र पैकी 12700 हेक्टरवर भाताची लागवड होते.
भात शेतकऱ्यांना जणू दिवाळी बोनस क्षेत्रातुन 2019 साली - प्रति हेक्टरी 35 क्विंटल प्रमाणे 4 लाख 44 हजार 500 क्विंटल उत्पादन झाले. 2020 साली - प्रति हेक्टरी 34.37 क्विंटल प्रमाणे 4 लाख 36 हजार 499 क्विंटल इतके उत्पादन झाले. 2021 साली - प्रति हेक्टर 43.79 क्विंटल प्रमाणे 5 लाख 56 हजार 133 क्विंटल इतके उत्पादन झाले होते. तर 2022 म्हणजे यंदा प्रति हेक्टरी सरासरी 52.33 क्विंटल अपेक्षित आहे. त्यानुसार 6 लाख 64 हजार 591 क्विंटल उत्पादन होईल. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात शेतकऱ्यांचे सरासरी 20 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे. ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी घातले. मात्र याच अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील भात शेतकऱ्यांना जणू दिवाळी बोनस मिळाला आहे.