पुणे- मला भाजपकडून 100 कोटींची ऑफर होती, मात्र मी भाजपमध्ये गेलो नाही. असा दावा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 100 कोटी रुपये द्यायला ते काय गोळ्या बिस्कीट आहेत का? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच अशाप्रकारचे वक्तव्य करून मी राष्ट्रवादीशी किती प्रामाणीक आहे, हे त्यांना दाखवायचे आहे. असेही यावेळी पडळकर यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये हेळवे समाजाच्या मेळाव्यात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले होते आमदार शशिकांत शिंदे?
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता.
शिंदे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही
त्यावर गोपीचंद पडळकर म्हणाले की, काही लोकांना काहीतरी बोलून राष्ट्रवादीत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे निवडणूक हरलेले आहेत. त्यांना कोण कशासाठी पैसे देईल! 100 कोटी हे गोळ्या बिस्कीट नाहीत, जे यांना देता येतील. त्यांना भ्रष्टाचाराची सवय लागलेली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असे मोठे आकडे येतात. ग्रामपंचायतमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळं काहीतरी स्टेटमेंट करून मी राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक आहे. बाहेरचे लोक बोलवत असताना देखील मी गेलो नाही. हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचा खोट्या पद्धतीने बाऊ केला जातोय. त्यामुळं त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही अस त्यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासीन
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायालयात फॉलअप घ्यायला हवा होता. त्यांच्याच वकिलाने सांगितलं की सरकार माहिती देत नाही. त्यामुळं त्यांनी व्यवस्थित पाठपुरावा केला नसल्याचे सिद्ध होते. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार बैठकच घेत नसल्याचा आरोपही यावेळी पडळकर यांनी केला आहे.