पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी 55 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण काही क्षणात लंपास केले. प्रियंका ज्वेलर्स या दुकानात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या तीन महिलांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकडमधील ताथवडे येथे असलेल्या प्रियांका ज्वेलर्स येथे तीन महिला ग्राहक म्हणून आल्या होत्या. काही मिनिटे त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करायचे असल्याचे दाखवत वेगवेगळे दागिने पाहिले. दुकानदार इतर काही दागिने दाखवत असताना त्यातील एका महिलेने आपल्या मुठीत 55 हजार रुपये किंमतीचे गंठण घेऊन पाठीमागे थांबलेल्या महिलेकडे हातचलाखी करून दिले. त्यानंतर काही मिनिटांनी या दोन्ही महिला निघून गेल्या.
हा सर्व प्रकार दुकानदाराच्या उशिरा लक्षात आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.