पुणे- गिरीश बापट यांचे सर्वच राजकीय पक्षाशी एवढे चांगले संबंध आहेत, की ते आमदारकीला उभे राहिले तरीही आणि खासदारकीला उभे राहिले तरीपण निवडून येतात, अशी मिश्किल टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या समारंभात पवार बोलत होते. या कार्यक्रमाला पुण्याचे खासदार गिरीश बापट, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, वात्रटिकाकर रामदास फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गिरीश बापट विचाराने थोडेसे कॉंग्रेसी
या कार्यक्रमात बोलताना सर्वच पक्षांच्या लोकांशी माझे चांगले संबंध असल्याचे गिरीश बापट यांनी म्हटले होते. यावर पवार यांनी उत्तर देत, खासदार गिरीश बापट यांचे विचार हे थोडेसे काँग्रेसी विचार आहेत. ते भाजपचे खासदार नसून, पुण्याचे खासदार आहेत. निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातर्फे जरी निवडणूक लढवली तरी निवडून आल्यानंतर तो संबंधित मतदारसंघाचाच खसदार असतो, म्हणून बापट हे भाजपचे नव्हे तर पुण्याचे खासदार आहेत. असेही यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.