पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या महागड्या मोटारी परराज्यातून चोरून त्यांचे चासी नंबर बदलून कमी किमतीत विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून 13 महागड्या मोटारींंसह 1 कोटी 39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आतापर्यंत केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 58 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या चारचाकी विकणारी टोळी जेरबंद या प्रकरणी मनजीत जोगिंदरसिंग मारवा, दीपक चमनलाल खन्ना, प्रतीक उर्फ नागेश छगन देशमुख, हारून शरीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी मनजीत मारवाच्या विरोधात दिल्ली, हरयाणात 12 गुन्हे दाखल आहेत. तर, दीपक खन्ना विरोधात दिल्ली, हरयाणा आणि पंजाबमध्ये 38 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.संबंधित चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट - 1 च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. आरोपी मनजीत मारवा पुण्यातील कोंढवा परिसरात नवे गोडाऊन भाड्याने घेऊन गॅरेज सुरू करण्याच्या तयारीत होता. तो वीमा कंपनीकडून अपघातग्रस्त चारचाकी कागदपत्रांसह विकत घ्यायचा. विकत घेतलेल्या गाड्यांच्या त्याच मॉडेलची व रंगाची चारचाकी गाडी पंजाब, हरयाणा, चंदीगड तसेच दिल्लीतून दीपक खन्ना चोरी करून आणून त्या मनजीत मारवाला देत असे.
यानंतर त्या गाडीवर अपघातग्रस्त वाहनाचा चासी व इंजिन क्रमांक लाऊन गाडीची पुन्हा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मनजीत मारवा व दीपक खन्ना हे सराईत गुन्हेगार असून मनजीत विरोधात दिल्ली, हरयाणा येथे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दीपक खन्ना विरोधात दिल्ली, हरयाणा, पंजाब या ठिकाणी 38 गुन्हे दाखल आहेत.