सातारा/पुणे - विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून समोर आली आहे. चौघेही मृत इसम हे निगडे (ता. भोर) गावातील आहेत.
गावातील नदीवर इलेक्ट्रीक मोटर बसविण्यासाठी गेले असताना विजेचा शॉक लागून ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप चार शेतकऱ्यांचा जीव गेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. घटना घडण्याच्याआधी सतत सहावेळा लाईट गेली होती. विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलीस आरोग्य विभाग दाखल झाले आहे. घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.