पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्रीपासून भोसरी परिसरातील इतर ठिकाणे जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २१ जण कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे समोर आले होते. त्यानंतर दापोडी, कासारवाडीसह इतर ठिकाणे सील करण्यात आली आहेत. दापोडी येथील सांगवी आणि पिंपळे गुरवला जोडणारा मार्ग बंद करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या ५१ वर पोहचली असून सर्वाधिक कोरोनाबाधित हे भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळले आहेत. त्यामुळे या परिसराला सील करण्यात आले आहे. तसेच, तिथे दुसऱ्या परिसराला जोडणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. दापोडी आणि कासारवाडी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तेथील परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. तेथील नागरिक इतरत्र जाऊ नयेत किंवा तेथील वाहतूक दुसऱ्या ठिकाणी होऊ नये, म्हणून सांगवी आणि पिंपळे गुरवला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.