पुणे - पुण्यातील उरुळी देवाची परिसरातील एका कापडाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व कामगार काम संपल्यानंतर रोज दुकानातच झोपत होते आणि दुकानाचा मालक बाहेरून कुलूप लावून जात असे. पुण्यातील कोंढवा परिसरातही काही वर्षांपूर्वी एक अशीच घटना घडली होती. त्यावेळी एका बेकरीच्या आत झोपलेल्या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अशा घटना वारंवार घडत असतानाही प्रशासन मात्र अशा घटना टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नाही.
पुण्यातील उरुळी देवाची येथे राजयोग साडी सेंटर हे सात हजार स्क्वेअर फूट जागेवरील प्रशस्त कपड्यांचे दालन आहे. या दुकानात काम करणारे पाच कामगार नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर दुकानातच झोपले होते. परंतु पहाटे साडेतीनच्या सुमारास या दुकानात अचानक आग लागली. यावेळी यातील एका कामगाराने दुकान मॅनेजरला फोन करून आग लागल्याचे सांगितले. परंतु बाहेरून कुलूप लावले असल्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नसल्याचेही सांगितले. दुकान मॅनेजर काही वेळाने त्याठिकाणी अलाही परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि दुकानातील पाचही कामगारांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. या दुकानात आग विझवण्यासाठी लागणारी योग्य ती यंत्रणा नसल्याचीही माहिती आता समोर येत आहे. बाहेरून कुलूप लावून कामगारांना आत कोंडून ठेऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी दुकानमालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी जयंत मीना यांनी दिली.
हडपसर परिसरातील फुरसुंगी हा भाग मागील आठ वर्षांपासून होलसेल कपडा मार्केट म्हणून उदयास येत आहे. येथील वडकी ते भेकराई नगर या परिसरात होलसेल कपड्यांची 60 ते 70 दुकाने आहेत.
पुणे जिल्ह्यातून नागरिक या ठिकाणी कपडे खरेदीसाठी येत असतात. या सर्व दुकानात परभणी, नांदेड, बीड आणि राजस्थान येथील कामगार काम करतात. काम झाल्यानंतर काही पैसे वाचविण्यासाठी ते रात्री दुकानातच झोपतात. परंतु अशाप्रकारे दुकानात झोपणे किती घातक होऊ शकते हे आजच्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान, या आगीची चौकशी करण्यासाठी आणि येथील दुकानामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस पुणे महानगरपालिकेसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी जयंत मीना यांनी दिली.
शहरात यापूर्वी अशाप्रकारे आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही कालावधी जाताच याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी तरी प्रशासन योग्य कारवाई करेल अशी आशा आहे.