पुणे (बारामती) - येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण महिला रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती नगरपालिका, प्रशासकीय भवन, तसेच शहरातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या चार खासगी रुग्णालयांचे अनेक दिवसांपासून फायर ऑडिटच झालेले नाही. तर अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या सिलेंडरची मुदत संपलेली आहे. तसेच फायर फायटिंग बॉक्सची दुरवस्था झाली असून ते केवळ शोभे पुरतेच असल्याचे दिसून आले.
फायर फायटिंगची दुरावस्था -
महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात फायर फायटिंग बॉक्सची दुरवस्था झाली आहे. आग दुर्घटनेवेळी आग विझवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या फायटिंग बॉक्समधील पाईपच नसल्याचे समोर आले आहे. तसेच रुई ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथील अनेक सिलेंडरची मुदत संपली. त्याठिकाणी वर्षभरापासून ऑडिट झालेले नाही. या तिन्ही रुग्णालयातील गॅस सिलेंडर टप्प्याटप्प्याने भरले जातात. ज्या गॅस सिलेंडरची मुदत संपली आहे, तेही तात्काळ बसवले जाणार आहेत. आगी संदर्भात उपाय योजनेमध्ये त्रुटी असतील त्या तात्काळ मार्गी लावली जातील, असे अधिष्ठाता डॉ.सदानंद काळे यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अग्निशामक गॅस सिलेंडरची मुदत संपली असून दोन वर्षाहून अधिक काळापासून फायर ऑडिट झाले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता निधीअभावी मुदत संपलेल्या गॅस सिलेंडरचे रिफिलिंग केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील शासकीय रुग्णालय व कार्यालयात अग्निशमन व्यवस्थेचे कमी-अधिक प्रमाणात डिझाइन झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात ही अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीसाठी चालू आहे की नाही याची दर सहा महिन्यांनी पाहणी करणे गरजेचे असते. बारामतीत त्याची पाहणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. सदर अग्निशमन यंत्रणा ही केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. विशेष म्हणजे आग लागल्यास ठिकठिकाणी लावण्यात आलेले गॅस सिलेंडरचा वापर कसा करावा, याबाबत येथील अनेक कर्मचारी अनभिज्ञ असल्याचेही समोर आले आहे.
फायर ऑडिट गरजेचे -
गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात आगीच्या घटना घडल्या. भंडारा येथे आगीची घटना घडून दहा निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला. सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीतही पाच मजुरांचा जीव गेला. भविष्यात अशा घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी रुग्णालये व कार्यालयांनी अग्निशमन यंत्रणेचे वेळोवेळी ऑडिट करणे गरजेचे आहे.