पुणे - ग्रामिण भागात कडक लॉकडाऊन करुन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करुन आखाडपार्ट्यांचा जोर वाढला आहे. तळेगाव ढमढेरे येथील भिमशेतवस्तीवर डॉक्टरांच्या आखाडपार्टीवर शिक्रापूर पोलिसांनी छापा मारुन दोन हॉटेल मालकांसह 11 डॉक्टरांवर लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शिरुर, खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्यात कडक लॉकडाऊन करुन संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना पायदळी तुडवत सर्वत्र आखाडपार्ट्यांची ओली सुखी पार्ट्या सुरू आहे. अशा पार्ट्यांवर शिक्रापूर पोलीस नजर ठेवून असताना शिरुर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी रंगली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राजेश माळी यांच्या पोलीस टीम घटनास्थळी दाखल होऊन छापा मारुन 11 डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. अशाच पद्धतीने आखाड पार्टी सुरू असणाऱ्या दोन हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टर आखाडपार्ट्यांमध्ये दंग...
देशावर कोरोनाच्या महामारीचे संकट असताना प्रशासन, पोलीस,आरोग्य विभाग कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक करुन लढत आहे. यामध्ये असंख्य डॉक्टरही या कोरोनाच्या लढाईत जीवाची बाजी लावून काम करत आहे. मात्र, शिरुर तालुक्यातील 11 डॉक्टर आपले कर्तव्य व जबाबदारी विसरुन आखाडपार्टीमध्ये व्यस्त आहेत, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.