पुणे - 'कलगीतुरा' हा शब्द ऐकला की, आपल्या नजरेसमोर येतात ते निवडणुकांच्या काळात एकमेकांवर तोंडसुख घेणारे राजकारणी नेतेमंडळी. मात्र, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत मागील 26 वर्षांपासून एक आगळा वेगळा 'कलगीतुरा' रंगतोय. तर हा कलगीतुरा राजकारणी मंडळींचा नाही, तर शेतकऱ्यांचा असतो.
नारळी पौर्णिमेनिमित्त पिंपळवंडी येथे गुरूवारी व शुक्रवारी 2 दिवस हा कलगीतुरा रंगला होता. यामध्ये शाहीर नवनाथ काळे व शाहीर साहेबराव पवार यांचा गुरुवारी तर शाहीर मारुती भुजबळ व शाहीर रामदास गुंड यांचा शुक्रवारी कलगीतुरा रंगला.
ग्रामीण भागातील गावा-गावात विविध संस्कृतींचे वेगळेपण असून ही संस्कृती जपण्यासाठी पिंपळवंडीत भव्य कलगीतुऱ्याचे सामने भरवण्यात आले होते. रोजच्या धका-धकीच्या जीवनात ग्रामीण भागातील शेतकरी शेतात कबाडकष्ट करत असतो. यातून विरंगुळा मिळवा म्हणून कलगीतुऱ्याचा सामना भरवण्यात आला होता. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी हजेरी लावली होती.