पुणे- जिल्ह्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीची मुदत ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे राज्यात टोलमुक्ती करू, असे सांगत सत्तेत आलेल्या सरकारने आता पाच वर्षानंतर तरी द्रुतगती महामार्गावरील टोल मुक्त करावा, अशी मागणी 'सजग नागरिक मंच'ने केली आहे.
द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीचे अधिकार आयआरबी कंपनीला ऑगस्ट 2004 मध्ये 15 वर्षांसाठी देण्याचा करार राज्य रस्ते विकास महामंडळाने केला होता. या कराराची मुदत 8 ऑगस्ट 2019 मध्ये संपत आहे. यामुळे आता परत एकदा टोलवसुलीचा नवीन करार करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा विचार आहे. रस्ते विकास महामंडळाने तीन महिन्यांसाठी किंवा नवीन टोल कंत्राटदार सापडेपर्यंतच्या काळासाठी एक टोल वसुली टेंडर काढले आहे. मुळात या रस्त्यावरच्या आत्ताच्या कंत्राटामधील टोलवसुलीने कंत्राटदाराला अवाच्या-सव्वा नफा झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही सरकारने त्याकडे कानाडोळा केला. ज्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. असे, सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.