पुणे - इमारतींच्या छपरांवर किंवा मोकळ्या मैदानात पॅनेल बसवून सौरऊर्जेची निर्मिती सर्वत्र केली जाते. पण, उंच इमारतीच्या काचेच्या भिंतीद्वारेही सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच आले आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रायोगिक अनुभव केंद्र (एक्सिपिरिअन्स सेंटर) उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पार पडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागात (स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज) हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या चारही भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण काचा बसवण्यात आल्या आहेत. या चार भिंतींद्वारे दररोज 14-15 युनिट उर्जा निर्मिती होऊ लागली आहे. सोलर स्केप एन्टरप्रायझेस एलएलपी या कंपनीने चीनमधून हे तंत्रज्ञान आणले आहे. सुरवातीच्या काळात येथे या काचांच्या भिंती उभारण्यासाठी आवश्यक साहित्याची जुळणी आणि पुढील टप्प्यात उत्पादनही केले जाणार आहे. देशातील हा असा पहिलाच उपक्रम आहे.
सध्या सौरउर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या फोटोव्होल्टॅइक (पीव्ही) तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे कॅन्डेमिअम टेलेरॉइड (सीडीटीई) तंत्रज्ञान चीन आणि युरोपीय देशांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून जास्त वापरले जाऊ लागले आहे. या तंत्रज्ञानामुळे उंच इमारतीच्या छतापेक्षा जास्त असलेल्या भिंतींच्या भागांचा ऊर्जानिर्मितीसाठी वापर करणे शक्य झाले आहे. तसेच या भिंती जास्त सुरक्षित असतात. 'पॉवर ग्लास' असे रास्त वर्णन होऊ शकणाऱ्या या काचेच्या भिंतींमुळे इमारतीतील उष्णता कमी होतेच, शिवाय अपारंपरिक उर्जानिर्मिती केल्यामुळे संबंधित इमारतीला 'ग्रीन रेटिंग'ही मिळते. विविध रंगांमध्ये या काचा उपलब्ध असून त्यांची दृश्यमानता हवी त्या प्रमाणात नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच सर्व प्रकारच्या हवामानामध्ये टिकण्याची या काचांची क्षमता आहे.
विद्यापीठाच्या आवारात हे 'अनुभव केंद्र' उभारल्यामुळे उर्जा विभागाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा -शिरुरमध्ये बेकायदेशीर धंद्यांची तक्रार देणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण