राजगुरुनगर, पुणे - उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात १३ दिवस उपचार सुरू होते. आज दिलीप वळसे-पाटील कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यांनी रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ यांचे आभार मानले आहेत.
उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना २९ ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी दिलीप वळसे पाटील मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रायलयात उपस्थित होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आल्यानंतर मंत्रालयातून ते थेट रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर 13 दिवस उपचार सुरू होते.
कोरोनावर यशस्वी मात करुन ते आज घरी परतले असल्याची माहिती त्यांची मुलगी पूर्वा वळसे-पाटील यांनी दिली आहे.
वाढदिवस रुग्णालयातच
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा वाढदिवस ३० ऑक्टोबरला होता. मात्र २९ ऑक्टोबरला वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. वळसे-पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात करावी यासाठी आंबेगाव विधानसभा मतदार संघात अनेकांनी प्रार्थना केली होती. यामध्ये दिलीप वळसे-पाटील यांचे पूर्वीचे जीवलग मित्र व सध्याचे राजकीय विरोधक माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी "साहेब लवकर बरे व्हा" असेही म्हटले होते.