पुणे : ईडीकडून पुण्यात आज पुन्हा एकदा अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या साखर कारखाना मनी लाँडरींग प्रकरणी ही छापेमारी करण्यात येत आहे. सोमवारी शहरात तब्बल नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. माजी मंत्री मुश्रीफ यांच्या व्यवसायिक भागीदार असलेल्या पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी आणि कंपन्यांच्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. याआधी देखील ईडीकडून पुण्यातील या व्यावसायिकाच्या घरी तसेच कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला आहे.
कार्यालयांवर छापेमारी : पुण्यातील सॅलिस्बरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. याआधी देखील मागच्या महिन्यात पुण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात ही कारवाईही करण्यात आली होती. आत पुन्हा आज शहरात काही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये व्यवसायिक विवेक गव्हाणे, सीए जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी तसेच कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात करण्यात येत आहे. याअगोदरही देखील ईडीकडून पुण्यातील व्यावसायिकाच्या घरी व कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. काही ठिकाणी तर ये जा करण्यात देखील प्रतिबंधित करण्यात आले होते.
मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनी व जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर तसेच इतर भागात ईडीकडून चौकशी केली जात आहे. अनेक वेळा ईडीकडून मुश्रीफ हजर राहण्याबाबत समन्स देखील बजाविण्यात आली होती. कागल येथील घरावर अनेकवेळा छापेमारी देखील करण्यात आली आहे.