पुणे - बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीमध्ये बुधवारी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती खबरदारी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. अविनाश मजली (वय-64) आणि अपर्णा मजली (वय-54), अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजली दाम्पत्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) घरात पेस्ट कंट्रोल केले आणि खबरदारी म्हणून ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. दरम्यान, सायंकाळी घरी परत आले. मात्र, पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यावी लागणारी खबरदारी त्यांनी घेतली नाहीत. घराची खिडक्या, दारे उघडले नाहीत. पंखा चालू न करता टीव्ही पाहात बसले. काही वेळाने चक्कर येऊन दोघेही खाली पडले. मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता, काही डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
![pest control couple death](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6054404_thumbn.jpg)
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्याने बीडवरून काम करण्यासाठी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच घटना घडली होती.
हेही वाचा - नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी