पुणे- दुहेरी खूनाच्या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. पुणे शहराजवळ असणाऱ्या सासवड भागात आईचा, तर कात्रज बोगद्याजवळ ८ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मृतदेहांच्या शरीरावर जखमा आढळल्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले असावेत. असा अंदाज वर्तविला जात आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
खून प्रकरणात आणखी एक वळण
मयत महिलेचे नाव आलिया आबिदा शेख आणि मुलाचे नाव आयान शेख असे आहे. महिलेच्या खूनप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. पोलिसांनी या गुन्ह्याच्या शोध सुरू केला असता, या महिलेची चारचाकी गाडी पुणे-सातारा रस्त्यावरील एका चित्रपटगृहासमोर आढळली आहे. त्यामुळे या खून प्रकरणात आणखी एक वळण निर्माण झाला आहे.
खळद गावाशेजारी महिलेचा आढळला
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हे पुण्यातील धानोरी परिसरातील रहिवाशी आहेत. आज सकाळच्या सुमारास सासवड जवळील खळद गावाशेजारी यातील महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत खूनाचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत हा खूनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली होती. मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे फोटो पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाठवले होते.
कात्रज बोगद्याजवळ आठ वर्षीय मुलाचा मृतदेह
दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास कात्रज बोगद्याजवळ ८ वर्षीय मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरवात केली, असता महिला आणि हा मुलगा माय-लेक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर हे दोघे धानोरी भागातील असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात दोघेही दोन ते तीन दिवसांपूर्वी पिकनिकसाठी म्हणून घराबाहेर पडले असल्याचे समोर आले आहे. तर सातारा रस्त्यावरील एका चित्रपटगृहाजवळ त्यांची कार सापडल्यामुळे या प्रकारात आणखी एक वळण निर्माण झाले आहे. त्या दोघांचाही खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा- नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ तासांत दोन खून