पुणे - शहरात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी एका आदेशाद्वारे जिल्ह्यात आपत्ती जाहीर केली आहे.
पुणे शहरातील एका दाम्पत्याला दुबईतून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात या दाम्पत्याची मुलगी मुंबईहून पुण्यापर्यंत ज्या टॅक्सीत प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि सहप्रवाशांचीही तपासणी करण्यात आली होती. यात दाम्पत्याची मुलगी, टॅक्सीचालक आणि एका सहप्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर पुण्यातल्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - कोरोना विषाणूच्या सावटाखाली पुण्यात धुळवड साजरी
दरम्यान, या विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये, त्यावर तत्काळ नियंत्रण आणता यावे, यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांना 'इन्सिडेंट कमांडर' म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नियंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाय योजना, कोरोना संदर्भात आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करणे, स्वतंत्र वैद्यकीय पथक तयार करून 24 तास तैनात ठेवणे, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था, विमानतळावरून आलेल्या नागरिकांची माहिती घेणे, त्यांचा शोध घेणे, त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, औषध विक्रेत्यांना मास्कची चढ्या भावाने विक्री करु न देणे, औषधांचा साठा करु न देणे, अशा गोष्टी केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे, खासगी डॉक्टर सेवा आणि खासगी रुग्णालयातील सामग्री अधिग्रहित करण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.