पुणे - मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाड्याने लोकं आणून गर्दी केली, असा आरोप धनजंय मुंडे यांनी केला. ते आज शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली.
शिरुर लोकसभा मतदारसंघात यावेळी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. मंगळवारी शिक्रापूर येथे मुख्यमंत्र्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचा उल्लेख कलाकार असा केला होता. त्यामुळे आज मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी जी सभा घेतली, यामध्ये भाड्याने लोक आणली होती, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना भाजपमध्ये असणारे कलाकार चालतात पण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणणाऱ्या कोल्हेंची का अडचण होते, असा सवालही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारला.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोल्हे यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे येथे आज सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबंध देशातील जनतेला १५ लाख रुपये देतो, असे सांगून फसवले आहे. या वेळी तर ते २५ लाखांचे आश्वासन देतील, असे म्हणत भाजप आणि मोदींवर टीका केली. यावेळी त्यांनी संघाच्या हाप चड्डीवरून ही मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. हाप चड्डीची फुलपँट झाली म्हणजे तुम्हाला शहाणपण आले असे नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.