पुणे - आज श्रावण मासातील तिसरा सोमवार असून १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. पांढऱ्याशुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेला आहे.
मागील ३ दिवसांपासून सुट्टीचा विकेंड पाहून लाखोंच्या संख्येने भाविक भीमाशंकराच्या दर्शनाला येत आहेत. तर भाविकांना कुठल्याही संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जंगल परिसरांमध्ये ४ ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर खासगी व एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
तिसऱ्या सोमवारी पहाटेची आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. याठिकाणी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचे १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुखकर व्हावे, यासाठी देवस्थानच्यावतीने चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.
निसर्गरम्य वातावरणाचा मनमोहक आनंद येथे येणारा प्रत्येक भाविक घेत आहे. या थंडगार वातावरणात पांढऱ्याशुभ्र धुक्यामध्ये मन प्रसन्न करून टाकणाऱ्या या परिसरात ओम नमः शिवाय, हर हर महादेव नामाचा जयघोष होत आहे.