पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची मूर्ती पालखीतून मुख्य उत्सव मंडपात गणपती बप्पा मोरया...मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आणण्यात आली आहे.
महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि दगडूशेठ गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मोजक्याच भाविकांची उपस्थिती होती. दरवर्षी मोठ्या वाजतगाजत पुण्याच्या पालकमंत्रीच्या हस्ते बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरवात करण्यात येते. पण, यंदा तसे काही नसून कोरोनाच्या पाश्वभूमीवर सेवा उत्सव साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपतीने घेतला आहे.घरीच राहून आपण ऑनलाईन पध्दतीने गणपतीचे दर्शन घेऊ शकता असे आवाहन कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पुणेकरांना केले.