पुणे - दौंड तालुक्यातील चौफुला येथे महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजीत केली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी शरद पवार आणि राहूल गांधी यांच्यालर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादी पक्षाची अवस्था 'शोले' चित्रपटातील जेलर सारखी झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधे इधर जाओ ..आधे उधर जाओ ..और कोई बचा तो मेरे पीछे आओ .. कोणी उरलेलाच नाही अशी अवस्था राष्ट्रवादी पक्षाची झाली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... धक्कादायक.. भाजपनंतर आता काँग्रेसचा 'टी शर्ट' घालून तरुणाची आत्महत्या
दौंडच्या सभेत शरद पवारांना लक्ष्य
शरद पवार म्हणतात मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. मी अनेक पैलवान तयार करतो, पण पवार साहेब एकही पैलवान का तुमच्यासोबत राहत नाही? याचं कारण काय आहे? आज उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला दाखवायलाही पैलवान राहिलेला नाही. सगळ्या मतदारसंघात तुम्हालाच जावं लागतं ही अवस्था तुमच्या पक्षाची का झाली? अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यावर केली आहे.
हेही वाचा... 'गाव तिथे बिअर बार' चंद्रपूरातील महिला उमेदवाराचं अनोखे आश्वासन
राहुल गांधी आणि काँग्रेसवर मुख्यमंत्र्यांची टीका
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसबद्दल तर न बोललेलं बरं. राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे आमचेच उमेदवार निवडून येतात. राहुल गांधी महाराष्ट्रात आले आणि भाषणात म्हणाले सत्तर वर्षापासून तुमच्यावर अन्याय होतोय, सत्तर वर्षापासून तुमचे कामे होत नाहीत, सत्तर वर्षापासून भ्रष्टाचार चालला आहे. परंतु राहुल गांधी यांच्या लक्षातच येत नाही की आज 70 वर्षे पैकी 60 वर्षे त्यांचे काँग्रेसच सरकार होतं. आमचे डायलॉग राहुल गांधी मारायला लागले आहेत, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
हेही वाचा... शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे विरुद्ध थोरात लढतीत रंगत
.... तर दौंडला मंत्रीपद
देवेंद्र फडणवीस दौंड तालुक्यातील चौफुला येथे महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जनतेला म्हणाले की, तुम्ही राहुल कुल यांना गेल्या वेळेपेक्षा दुप्पट मताने या निवडणुकीत तुम्ही निवडून द्या. तुम्ही राहुल कुल यांना दुप्पट मतांनी आमदार म्हणून निवडून पाठवा, मी त्यांना मंत्री बनवून पाठवतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे दौंड तालुक्याला मंत्रिपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.