पुणे - सामान्य जनतेसाठी उभारलेल्या कार्यालयातून जनतेची कामे वेगाने होणे गरजेचे आहे. मात्र, नियमावलीचा घोळ वर्षानुवर्षे घालू नका, असा सल्ला देत आता प्राधिकरणाचे कार्यालय भव्य करण्यापर्यंतच न थांबता कामे करा. नाहीतर, सरकार म्हणून साईड पोस्टिंगचा पर्याय आमच्याकडे आहेच, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच आलिशान कार्यालय थाटून जनतेच्या कररूपी पैशाची उधळपट्टी होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन आलिशान कार्यालयाचे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या नवीन कार्यालयासाठी महिन्याला 12 लाख रुपये भाडे मोजण्याला त्यांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पवार यांनी भरमसाठ भाड्यावरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सोबतच या प्राधिकरणाच्या माध्यमातून वर्षाला केवळ 700 घरे सामान्य जनतेला दिली जात असल्याने हे भूषणावह नाही. तर दरवर्षी काही हजार घरे ही जनतेला मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. केवळ नियमांमध्ये अडकून राहू नका, कायद्याच्या चौकटीत राहून जोमाने कामे झाली पाहिजेत. तसेच नियमावलीचा घोळ वर्षानुवर्षे घालू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. आता प्राधिकरणाचे कार्यालय भव्य करण्यापर्यंतच न थांबता कामे करा, नाही तर सरकार म्हणून साईड पोस्टिंगचा पर्याय आमच्याकडे आहेच असा दम ही भरला. यावेळी कार्यक्रमात अजित पवारांच्या हटके कामाची झलक पहायला मिळाली.
हेही वाचा - उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार बायोपिक, 'ओह माय गॉड' चित्रपटाचे दिग्दर्शक करणार दिग्दर्शन
एकीकडे अजित पवारांनी दम भरलेला असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही सामान्यांना तातडीने आणि चांगली घरे मिळावी यासाठी झटपट निर्णय प्रक्रिया राबवत असल्याचे सांगितले. तसेच पुणे शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणसाठी (एसआरए) 275 स्वेअर फूटांची मर्यादा 300 स्वेअर फूट करण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले. या इमारतीची उंची वाढवण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आव्हाड यांनी यावेळी दिले.