पुणे - येथील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आदिवासी भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी भाताच्या आवणीच्या कामाला लागले आहेत. खेड तालुक्यातील विऱ्हाम गावात भर पावसात भातखाचरात भाताची आवणीचे काम सुरु होते. मात्र, खाचरातच असणाऱ्या विद्युत वाहिणीच्या खांबाचा अचानक बैलाला धक्का लागला. यात भरत विष्णू सावंत यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला.
पश्चिम आदिवासी भागात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून विद्युत लाईन अनेक ठिकाणी नादुरुस्त आहे. त्यामुळे खांब पडणे, तारा तुटणे, रोहित्रातील बिघाड अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, महावितरणचे याकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. बैलाचा झालेला मृत्यू हा महावितरणचा बेजबाबदारपणा आहे.
विऱ्हाम गावातील अनेक खांबावर विद्युत वाहिनीचा करंट उतरला आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसमवेत या परिसरातील लाईट फिडर बंद केला आहे. नागरिकांनी विद्युत वाहिनीच्या जवळपास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.