दौंड (पुणे) - गेले काही दिवस ढगाळ वातावरणासह दौंड तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. अशा वातावरणामुळे पिकांवर मावा, बुरशी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कसेबसे हाताशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
गेल्या १० ते १५ दिवसांपासून दौंड तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. याचा परिणाम कांदा, गहू, कोथिंबीर आणि इतर पिकांवर होत आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी होण्यासह कांद्यावर माव्याचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच गव्हावर तांबेरा रोग पडत आहे. शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे.
हेही वाचा-सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ नावावर आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल
अवकाळी रिमझिम पाऊस-
गेल्या काही दिवसांत पिकांना निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसत आहे. दौंड तालुक्यातील विविध गावांत गेल्या ३-४ दिवसांत रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यानंतर शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पुन्हा विविध पिके लावली. मात्र, या पिकांना ढगाळ वातावरणाचा आणि रिमझिम पावसाचा प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा-VIDEO: पेंच अभयारण्यात वाघिणीने केली सांबराची शिकार; व्हिडिओ व्हायरल
महागडी औषध फवारणी-
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत असल्याने शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत येताना दिसत आहेत.