पुणे : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नात महायुती आक्रमक झाली आहे. ३१ जुलैपर्यंत दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर १ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज(सोमवार) पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन आणि दूधाच्या पिशव्या प्रतिकात्मक भेट दिल्या.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा १ ऑगस्ट २०२० रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.' असा इशारा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यावेळी दिला.
कोरोनाच्या संकटामुळे दूध संकलन होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. दुधाचे भाव १६ ते १८ रुपये लिटर इतके घसरले आहेत. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय ठराविक दूध उत्पादक संधापुरतेच मर्यादित असून, राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. दूध उत्पादकांच्या पुढील मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात.' अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली.
यावेळी, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे (ए) शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.